ABOUT US

स्वतंत्रपूर्व काळात अंबाजोगाई (मोमिनाबाद) २५० वर्ष निझामी राजवटीत त्यापूर्वी  साधारण: तेवढाच काळ मुघल अमलाखाली होती. मुघल आणि निझामी राजवटीत शिक्षणाचा प्रसार अत्यल्प होता. सबंध तालुक्यात एखादे मिडलस्कूल असेल. अंबाजोगाईला ते होते. उच्चवर्गीय विद्यार्थी सातवी पर्यंत त्याचा लाभ घेऊ शकत. पण, त्यातही माध्यमाची मोठी धोंडी होती. निझामी राजवटीत बालवाडी ते पदव्युत्तर अभ्यासक्रम उर्दू माध्यमातूनच शिकवा लागे. त्यामुळेही अनेकांना शिक्षणापासून वंचित रहावे लागे. या अडचणीतून मार्ग काढावा आणि शिक्षणाचा प्रवाह मोकळा करावा या हेतूने अंबाजोगाईतील काही व्यापारी व वकील मंडळींनी एकत्र येवून इ.स . १९१८ साली ‘जोगाई मंदिरा’ च्या मदतीने एक मराठी माध्यमाची शाळा काढली. हि अंबाजोगाईच्या नव्हे तर मराठवाड्याच्या इतिहासात शैक्षणिक क्रांती होती. सर्वश्री भाऊसाहेब चौसाळकर (संस्थेचे पहिले सचिव), जनार्धानराव देसाई (देशपांडे), श्रीधरपंत सोमण,सदाशिवराव जोशी, शिवाजीराव चौसाळकर , वासुदेवराव दसगावकर, रघुनाथराव नागापूरकर आणि केशवराव कुर्डूकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतहि शाळा प्रगतीपथावर ठेवली. निझामी शासनाकडून काही मदत मिळणे तर सोडाच ८ वी चा वर्ग सुरु करण्याची परवानगीहि मिळेना. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी हिप्परगा, गुलबर्गा, व हैद्राबाद या ठिकाणी जावे लागे. अशा परिस्थितीत १९३५ साली पू. स्वामी रामानंद तीर्थ हिप्परगा सोडून या शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले,  त्यांनी व पू. नारायणराव जोशी यांच्या अथक परिश्रमाने इयत्ता ८ वी ची परवानगी मिळवली. पू. स्वामीजी व त्यांचे सहकारी पू.बाबासाहेब परांजपे, आचार्य ग.धो. देशपांडे, बाबुराव कानडे , डॉ. देवीसिंग चौहान, केशवराव कुर्डूकर या शिक्षण प्रभृतींनी व चिंतामणराव कन्नडकर, पुरुषोत्तम चौसाळकर, भगवानराव धारूरकर, त्र्यंबकराव खुरसाळे, राजारामपंत सोनवलकर, बळीरामपंत कामखेडकर, लक्ष्मनराव भालचंद्र इ. संचालक प्रभृतींनी अविश्रांत प्रयत्नाने शाळेला सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक ते सर्व बौद्धिक व शाररीक संस्कार दिल्याने विद्यार्थ्यात ‘राष्ट्रीयत्वाची भावना जोपासणारे विद्यालय’ अशी ओळख निर्माण झाली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात सक्रीय असलेले अनेक सैनिक राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या या योगेश्वरी नूतन विद्यालयाचे विद्यार्थी होते.

या विद्यालयाचा लौकिक जसजसा वाढत गेला तसातसा सर्व मराठवाड्यात विद्यार्थीयांचा ओघ वाढत गेला व तशी वसतिगृहाची निकाडहि  वाढत गेली. स्वातंत्रपूर्व काळापासून संस्थेचे ४० विद्यार्थ्यांचे एक वसतीगृह होते; ते अपुरे पडू लागले. पुढे १९५६ साली पू. स्वामीजींनी योगेश्वरी महाविद्यालयाची स्थापना केली. १९५९ साली कला व वाणिज्य शाखा सुरु झाल्या. अनेक विषयात पदव्युतर अभ्यासक्रम सुरु झाले. ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला. १९७२ साली मुलींसाठी श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ कन्या शाळा सुरु झमी. २००७ साली मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरु करण्यात आले. २०११ साली तंत्रानिकेतंही सुरु करण्यात आले.